ताज्या घडामोडीपिंपरी

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये पिंपरी चिंचवडला अव्वल आणण्यासाठी अभिप्राय नोंदवा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना आवाहन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्व्हेक्षणात अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ही स्पर्धा देशभरातून घेतली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्पर्धेत सामील झाली आहे. या स्पर्धेसाठी नागरिकांचे अभिप्राय महत्वाचे असून त्यास अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला स्वच्छतेविषयक अभिप्राय देणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार तयारी केली आहे. आरोग्य विभागाकडून घराघरातील कचरा संकलित करून त्यावर पुढील योग्य ती प्रक्रिया केली जात आहे. नागरिकांमध्ये ओला, सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, कापडी पिशव्यांचा वापर या विषयी जनजागृती करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत.

सर्वात प्रथम नागरिकांनी https://sbmurban.org/feedback या संकेतस्थळावर जा.

त्यानंतर स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका आणि पसंतीची भाषा निवडा.

‘राज्य’ या पर्यायात ‘महाराष्ट्र’ आणि ‘जिल्हा’ या पर्यायात ‘पुणे’ निवडा

युएलबी पर्यायात ‘पिंपरी चिंचवड’ निवडा

त्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या प्रश्नांचे योग्य उत्तर द्या

तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी टाकून अर्ज सबमिट करा

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ या स्पर्धेत आपल्या पिंपरी चिंचवड शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात स्वच्छतेविषयक अभिप्राय नोंदवण्याची गरज आहे. हा अभिप्राय ऑनलाइन नोंदवता येत असून ही प्रक्रियाही सोपी आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी अभिप्राय नोंदवावा.

– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहराला ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये अव्वल क्रमांक मिळावा,, यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या स्पर्धेत ‘नागरिकांचा अभिप्राय’ यासाठी देखील गुण राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवावा.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button