ताज्या घडामोडीपिंपरी

महिलांना ट्रोलिंग करणे हे संकुचित मानसिकतेचे प्रतिक; महापालिकेच्या परिसंवादात वक्त्यांचा सूर  

Spread the love

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे विकृत मानसिकतेचा सामना करत आपल्या विचार व भूमिकेवर ठाम राहून सामाजिक क्रांतीचे पाऊल उचलले.  सावित्रीबाईंचा हा वारसा प्रत्येक महिलेने अंगीकारायला हवा. महिला अभिव्यक्त होत असताना जाणीवपूर्वक त्यांना ट्रोल करण्याची प्रवृत्ती वाढत असून संकुचित विचारसरणी आणि पुरुषी मानसिकतेचे हे प्रतिक आहे. अशा गोष्टींना महिलांसह समाजातील प्रत्येक घटकांनी ठामपणे प्रतिकार करून आपली भूमिका परखडपणे मांडली पाहिजे, असे विचार महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांनी मांडला.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि आजच्या महिलांची भूमिका” या विषयावरील परिसंवादात सहभागी वक्ते बोलत होते. यामध्ये उद्योजिका  डॉ. तृप्ती धनवटे- रामाने, पत्रकार अश्विनी डोके, शर्मिष्ठा भोसले, प्रा. शीलवंत गायकवाड सहभागी झाले होते.

डॉ. तृप्ती धनवटे- रामाने म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या विचारसरणीचा आधुनिक काळातील महिलांच्या सक्षमीकरणाशी थेट संबंध असून समाजात समानतेचा संदेश पसरवण्यासाठी त्यांचे योगदान देखील महत्वपूर्ण आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, आणि महिलांच्या स्वावलंबनावर तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सावित्रीबाईंचे विचार अंगीकारणे गरजेचे आहे. शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग रोजगार मिळविण्यासाठी केला गेला पाहिजे. आजच्या काळात कौशल्य शिक्षण व व्यावसायिक शिक्षणावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे,  महिला केवळ शिक्षणच नाही तर विविध क्षेत्रात आपली छाप पाडताना दिसत आहेत. विविध क्षेत्रात महिला यशाच्या शिखरावर असताना देखील त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अशा वेळी महिलांनी न डगमगता आपले कार्य नित्याने केले पाहिजे,असे मत डॉ. तृप्ती धनवटे- रामाने यांनी मांडले.

पत्रकार शर्मिष्ठा भोसले म्हणाल्या, शिक्षित समाजाने समानतेने वागावे, अशी साधारणपणे अपेक्षा असते. सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध महामानवांनी समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. मात्र लिंगभेद करून आपण समानतेच्या उद्दिष्टाला दूर करत असतो. महिलांची प्रतिमा उभी करताना त्यांना नेहमी विरोधात उभे करण्याचे काम काही माध्यमे करीत असतात. तर आजही आपण पारलिंगी समुहाचे अस्तित्वदेखील मान्य करीत नाही, ही शोकांतिका आहे. एवढेच नव्हे  तर समाजमाध्यमांवर स्त्रियांना होणारी ट्रोलिंग ही एक गंभीर सामजिक विकृती आहे. त्याचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.  ट्रोलिंगद्वारे महिलांवर होणारी टीका, अपमानास्पद भाष्य, धमक्या आणि ऑनलाइन छळ हे प्रकार केवळ वैयक्तिक स्वातंत्र्यावर हल्ला करतात असे नाही तर समाजातील लिंगभाव असमतोलाचे असणारे प्रतिबिंब देखील ठरतात.  यामुळे महिलांच्या आत्मविश्वासावर थेट परिणाम होतो. ट्रोलिंगमुळे अनेक स्त्रिया समाजमाध्यमांवर सक्रिय होण्यास घाबरतात किंवा आपले मत व्यक्त करणे टाळतात. ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि समाजातील भूमिका कुंठित होते. राजकारणामध्ये अजूनही महिलांचा सहभाग कमी आहे. सर्व क्षेत्रात आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी  महिलांना महामानवांच्या  विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सर्वाचीच आहे.

पत्रकार अश्विनी सातव – डोके म्हणाल्या, उत्तम सहजीवन कसे असावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आहे. त्यांच्या काळात त्यांनी अनिष्ठ रूढी व परंपरा झुगारून प्रगतीशील विचार आणि कृतींचा अवलंब केला. त्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ असायला हवे. आत्ताच्या काळात देखील असलेल्या रूढी व परंपरांची चिकित्सा करून योग्य काय आहे याचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. ट्रोलिंगविरोधी कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी अजूनही अपुरी आहे, त्यामुळे ट्रोल करणाऱ्या व्यक्तींना जबाबदार ठरवणे कठीण जाते. महिलांसह प्रत्येक घटकाला सुरक्षिततेची हमी देणे ही समाजाची आणि व्यवस्थेची जबाबदारी आहे. लिंगसमानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची खरी जाणीव आपल्या कृतीतून दिसली पाहिजे. महामानवांच्या त्यागाची आठवण ठेऊन समाजात वैश्विक बंधुभाव रुजल्यास विकासाला अधिक गती येईल, असा विश्वास अश्विनी सातव यांनी  व्यक्त केला.

प्रा. शीलवंत गायकवाड म्हणाले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षण तसेच समाजात समानतेचा संदेश पसरवण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष वाहून घेतले त्यामुळे आपण आज सुवर्णक्षण जगतो आहोत. सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांच्या विचारांना अंगीकारणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी समाजातील असमानता, अन्याय, अज्ञान आणि अंधश्रद्धा याविरुद्ध लढा दिला आणि स्त्रियांना व वंचितांना शिक्षणाचे हक्क मिळवून दिले. त्यांनी महिलांसाठी आणि वंचित वर्गासाठी शाळा स्थापन केल्या. त्यांच्या मते, शिक्षण हे व्यक्तीचे जीवन बदलण्याचे आणि समाज सुधारण्याचे प्रभावी साधन आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचे महत्व अधोरेखित केले. त्यांचे कार्य आजच्या स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरागत चालीरीतींवर प्रखर प्रहार केला. त्यांच्या विचारांमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. फुले दाम्पत्याच्या विचारांवर आधारित कार्य हे सामाजिक सुधारणांसाठी दिशादर्शक ठरू शकते. त्यांचे विचार अंगीकारून आपण अधिक प्रगत, समतोल आणि न्यायपूर्ण समाजाची उभारणी करू शकतो, असा विश्वास प्रा. गायकवाड यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, विशाल जाधव, शंकर लोंढे, संतोष जोगदंड, अॅड विद्या शिंदे, साधना मेश्राम, अनिरुद्ध सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button