भारताची अर्थव्यवस्था प्रगती पथाकडे – केंद्रीय बोर्डाचे संचालक सतीश मराठे
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील विद्यार्थ्यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया केंद्रीय बोर्डाचे संचालक सतीश मराठे यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रातील सद्यस्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांच्या हस्ते संचालक सतीश मराठे, व्यवस्थापकीय अधिकारी सुधाकर कुलकर्णी, जनता बँकेचे उपाध्यक्ष डॉ.मुकुंद तापकीर यांचा सत्कार करण्यात आला. एमबीएचे संचालक डॉ.सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा.गुरुराज डांगरे, प्रा. मनीष पाटणकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला., कारण लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प होते. परदेशी प्रसार माध्यमाने तर; कोविड काळात भारतीयांना अन्नधान्य मिळणार नाही. भूक-मारी होतील. लाखो लोक मृत्यूमुखी पडतील, असे वृत्त प्रसारित केले. परंतु, केंद्र सरकारने ७ ते ८ महिन्यातच अनेक गोष्टी पूर्वपदावर आणले. भारताने १०० हून अधिक देशांना 200 कोटी लसी पुरविल्या. कोरोना काळात आज काही प्रमाणात भारताची अवस्था कोसळली छोटे दुकानदार, हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल झाले. गेल्या दोन वर्षात विविध धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतले. आज औद्योगिक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने उत्पादन निर्मिती होत आहे. भारतात मोठी बाजारपेठ असल्यामुळे परदेशी उद्योजकांनी गुंतवणूक करून पोषक वातावरण निर्माण केले.
जागतिक अर्थव्यवस्थेचा अचूक अभ्यास करून वेळोवेळी तंत्रज्ञानात बदल करण्यात आले आहे. पूर्वी आपल्या देशात आयात जास्त व निर्यात कमी अशी अवस्था होती. आता इंजिन, कोच, सिग्नलिंग सिस्टीम भारतातून निर्यात होत आहे. इतर वस्तू देखील परदेशात निर्यात होऊन परकीय चलन भारत देशाला निर्माण होत आहे. बँकिंग क्षेत्रात डीजीटलायझेशन संगणकीकृत प्रणालीमुळे गुंतवणूक वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात भारतात विविध शहरात परकीय देश विविध क्षेत्रात गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत आहे. आज अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे, विविध माप दंडावर ती खरी उतरली असून सध्या जगात भारत ५ क्रमांक झेप घेतली., नजीकच्या काळात तिसऱ्या क्रमांकावर येईल., असा विश्वास श्री मराठे यांनी व्यक्त करून केंद्र सरकारने भारतातील मोठे, मध्यम व लघु-उद्योजक आणि बँकेमध्ये समन्वय साधून त्यांच्यात परस्पर सामंजस्य जिव्हाळ्याचे नातं निर्माण करून विविध योजना व कर्ज पुरवठा उद्योजकांना सोप्यावर रीतीने देण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगात आज भारताने मोठी झेप घेतली आहे. उच्च मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील विकासदर जो 15% वर होता तो आज 17.5% झाला आहे. पुढील काळात विकासदर 22 ते 25 टक्क्यावर जाईल असा विश्वास व्यक्त केला. जगभरातील 35 देशांनी व्यवहारासाठी रुपयाच्या स्वीकार केला ही बाब अभिमानास्पदच आहे. संरक्षण, फर्टीलायझर, लॉजिस्टिक कार्पोरेट क्षेत्रातील सद्यस्थितीची माहिती यावेळी श्री मराठी यांनी दिली. कृषी क्षेत्राबाबत ते पुढे म्हणाले, भारतात 14 कोटी शेतकरी असून त्यापैकी १ कोटी 25 लाख शेतकरी नैसर्गिक शेती करत आहे. शेतकऱ्यांच्या कल नैसर्गिक शेतीकडे जास्त आहे हे पाहणीत दिसून आले आहे. केंद्र सरकारचे अडीच लाख नैसर्गिक शेती सोसायटींना करण्याचा उद्देश ठेवून त्यांना विविध सहा प्रकारचे कर्ज पुरवठा करून त्यांचा आत्मनिर्भर करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे जीडीपी वाढण्यास मदत होईल. भारतात 70-88 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात शेती ग्रामीण भागातील शेतकरी इंटरनेटचा वापर कमी करतात. असे असले तरी देशातील अडीच लाख गावात इंटरनेट पोहोचविण्याचे उद्देश केंद्र सरकारचा आहे. शेवटच्या शेतकऱ्याला कर्ज पुरवठा कसा होईल. याकडे सरकारचे लक्ष आहे. देशातील दोन-तीन राज्य सोडली तर भारतभरात शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे रेकॉर्ड संगणकृत करण्यात आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही या बाबीला प्रोत्साहन देत आहे. ज्या शेतकऱ्याचे जमिनीचे रेकॉर्ड संगणकीकृत आहे, आधार कार्ड ला मोबाईल लिंक आहे. त्यांनी जमिनीची माहिती मोबाईलवर ॲपवर डाटा भरला तर कागदपत्रे विरहित नजीकच्या बँकेत कर्ज पुरवठा तात्काळ करता येणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील अनेक बँका शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात कर्जपुरवठा करताना दिसून येत नव्हते. यावेळी अनेक विद्यार्थी व प्राध्यापकांनी विचारलेल्या विविध शंका व प्रश्नांचे निराकरण करीत श्री मराठे यांनी त्यांचे समाधान होईल, असा शब्दात समर्पक उत्तरे दिली.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, पदवीग्रहण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनो नोकरी मिळणार याची आज माहिती नसली, तरी भविष्यात स्वतःला सिद्ध करण्याकरिता अवांतर वाचन करावे. सामान्य ज्ञानात भर पडण्याकरिता प्रख्यात लेखक, वैज्ञानिकांची माहिती वाचून ती आत्मसात करावी असे आवाहन केले. यावेळी डॉ. मुकुंद तापकीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी जेसिका लोबो यांनी केले. तर, आभार एमबीएचे संचालक डॉ.सचिन बोरगावे यांनी मानले.