महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करणाऱ्या ‘सक्षम उपक्रमा’स सुरुवात!
इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दोन टप्प्यात होणार उपक्रमाची अंमलबजावणी ; तीस हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत लाभ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सुधारण्यासाठी ‘सक्षम’ या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व निपुण भारत मिशन (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रीडिंग इन प्रॉफिशियन्सी विथ अंडरस्टँडिंग ॲण्ड न्यूमरसी) या अंतर्गत विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्यांची शैक्षणिक पातळी सुधारण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांचे त्यांच्या शैक्षणिक स्तरांनुसार गट करून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत, तीस हजारांहून अधिक विद्यार्थी सध्या लाभ घेत असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शहरातील महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ‘सक्षम’ उपक्रमाची सुरुवात!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सक्षम’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ने विद्यार्थ्यांच्या केलेल्या मूल्यांकनाच्या माहितीचा आधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर ठरविण्यासाठी व त्यांची गटामध्ये विभागणी करण्यासाठी घेण्यात आला. ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविणे व त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असून यामध्ये विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रभावीपणे सक्षम केले जात आहे.
दोन टप्प्यात होणार ‘सक्षम’ उपक्रमाची अंमलबजावणी!
विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरतेमध्ये वाढ होण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्येकी ४५ दिवसांच्या दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. ‘सक्षम’ उपक्रमाचा पहिला टप्पा सध्या सुरू झाला असून, यामध्ये शाळेचे पहिले २ तास भाषेवर (६० मिनिटे) आणि गणितावर (६० मिनिटे) लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर चालू होणाऱ्या दुसरा टप्प्यामध्ये ४५ मिनिटे भाषेवर आणि पुढील ४५ मिनिटे गणितावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. सध्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये सक्षम वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
विद्यार्थी सक्षम बनण्यासाठी ‘सक्षम बनू या’ पुस्तिकेचे वाटप!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांना ‘सक्षम बनू या’ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे. यापुस्तिकेमध्ये, ६ पुस्तिकांचा समावेश असून भाषेसाठी तीन आणि गणितासाठी तीन पुस्तिकांचा (शैक्षणिक स्तरावर आधारित) समावेश आहे. सदर पुस्तिकांची निर्मिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, युनिसेफ, विद्या परिषद आणि क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आली आहे. याबरोबरच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून, शिक्षक वर्ग निरीक्षण आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्फत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
‘सक्षम’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी महापालिका सदैव तत्पर!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व निपुण भारत मिशनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्यांची शैक्षणिक पातळी सुधारण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘सक्षम’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी महापालिका सदैव तत्पर आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
‘सक्षम’ उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याची मूलभूत साक्षरता वाढीस होणार मदत!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या ‘सक्षम’ उपक्रमांचा पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. यामधून विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरतावाढीस मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान वाढणे व मूलभूत साक्षरतेमध्ये वाढ होऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये प्रगती करण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रम महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे.
– प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
‘सक्षम’ उपक्रमाच्या पहिला टप्प्यातील विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद!
‘सक्षम’ उपक्रमाच्या माध्यमातून सध्या तिसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले असून तीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. ‘सक्षम’ उपक्रमाचा सध्या पहिला टप्पा सुरू असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना ‘सक्षम बनू या’ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे. सध्या सुरू असणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीरीत्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू असून उपक्रमास विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
– विजय थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
‘सक्षम बनवू या’ ही पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यास उपयुक्त
‘सक्षम’ उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून यामध्ये स्तर आधारित ‘सक्षम बनवू या’ ही पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यास उपयुक्त होत आहेत. सदर पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होत आहे. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना सदर उपक्रम प्रचंड पसंतीस उतरला असून सर्व विद्यार्थी सक्रिय सहभाग घेत आहे.
– मनीषा हेमंत सदावर्ते, मेंटॉर टीचर, पीसीएमसी पब्लिक स्कूल जाधववाडी मुले
‘सक्षम’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी!
पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये चालू असलेला ‘सक्षम’ हा शैक्षणिक उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. सदर उपक्रमामुळे अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करणे खूप सोपे झाले असून याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. अप्रगत विद्यार्थ्यांना अभ्यासाची छान गोडी लागली असून विद्यार्थी आवडीने उपक्रमात सहभागी होत आहेत.
– सौ.मीना अरुण गायकवाड, सहशिक्षिका, पीसीएमसी पब्लिक स्कूल दिघी मुले