ताज्या घडामोडीपिंपरी
एआयएमआयएम पक्षाच्यावतीने पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले व खर्या अर्थाने या देशात नागरिकांची सत्ता आली म्हणून आपण प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व अथक प्रयत्नांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान या देशाला मिळाले.
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयावर महाराष्ट्र महासचिव अकील मुजावर व शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीतं व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .
यावेळी AIMIM पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन हा देश एकसंघ ठेवला पण सध्या केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार हे देशाचे जातीधर्माच्या आधारावर विभाजन करू पाहत आहे,संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे यासाठी सर्वानी एकत्र येऊन या देशविरोधी पक्षाचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत व संविधानाच्या रक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे.
यावेळी AIMIM पक्षाचे महाराष्ट्र महासचिव व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे, खालिद मुजावर, कार्याध्यक्ष नियाज देसाई, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, मोहतसेन सिद्दिकी, आकीब शेख, गाझी शेख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.