ताज्या घडामोडीपिंपरी
गुरू पौर्णिमा निमित्त श्री साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रविवारी साजऱ्या होणाऱ्या गुरू पौर्णिमा निमित्त आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष व निमंत्रक सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
गुरू पौर्णिमा निमित्त शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या महोत्सवाची सांगता सोमवारी होणार आहे. यामध्ये रविवारी (दि. २१) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनई वादन, मंगल स्नान, श्री साई चरित्र पारायण प्रारंभ, सकाळी ७ वाजता श्रींची आरती, ८ ते ९ रुद्राभिषेक, यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती होणार आहे. सायंकाळी पाच ते दहा भजन संध्या, ५:३० वाजता पालखी पूजा व मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता धुपारती आणि रात्री ११ वाजता हरीजागर होईल. तसेच सोमवारी ( दि. २२) सकाळी सात वाजता आरती, ९ वाजता श्रींचे कीर्तन, ११ वाजता गोपाळ काला, १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी सात वाजता दुपारती, ७:३० पालखी पूजा व मिरवणूक, रात्री दहा वाजता शेजारती होऊन कार्यक्रम सांगता होईल. ज्या साई भक्तांना पारायण सोहळ्यात आणि जलदिंडी मध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त सुभाष नेलगे यांनी केले आहे.