
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौक परिसरातील गणेशम फेज २ सोसायटीमध्ये शुक्रवारी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या तत्परतेमुळे अग्निशमन दलाचे पथक अल्पावधीत घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
या दुर्घटनेदरम्यान सोसायटीमध्ये अडकलेल्या दोन चिमुकल्या मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदारांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागांकडून तपास सुरू आहे.
यावेळी अनिता संदीप काटे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, निवासी इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजना नियमितपणे तपासल्या जाव्यात. तसेच कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे.

















