
बांधकाम परवानगी विभागातील कथित भ्रष्टाचाराची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करा; विनोद नढेंचा आयुक्तांना इशारा
१५ दिवसांत कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील वाढत्या कथित भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार आणि महसूल बुडवण्याच्या प्रकारांची स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. येत्या १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बांधकाम परवानगी विभागातील काही अधिकाऱ्यांवर प्रशमन शुल्क (Compounding Charges) आकारणीत कथित हेराफेरी केल्याप्रकरणी झालेल्या निलंबन कारवाईचे नढे यांनी स्वागत केले. मात्र, हा प्रकार केवळ ‘हिमनगाचे एक टोक’ असून, विभागात अनेक वर्षांपासून संगनमताने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचे कथित प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे.
शहरातील अनेक निवासी व व्यावसायिक प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र (OC) देताना, नकाशे मंजूर करताना तसेच एफएसआय (FSI) आणि विकास शुल्काची गणना करताना नियमबाह्य सवलती देण्यात आल्याचा संशय नढे यांनी व्यक्त केला आहे. विकासकांच्या फायद्यासाठी महापालिकेच्या महसुलाचे नुकसान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
नियमबाह्य एफएसआय, आरक्षणांचे उल्लंघन, बनावट कागदपत्रांच्या आधारे टीडीआर लोडिंग, मंजूर नकाशापेक्षा वेगळे बांधकाम असतानाही दिलेली ओसी, पार्किंगचा अनधिकृत वापर आणि अग्निशमन नियमांचे उल्लंघन या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित प्रकल्पांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
तसेच विकासक आणि नागरिकांकडून कथित लाच उकळण्यासाठी फायली जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप करत, संपूर्ण बांधकाम परवानगी प्रक्रियेचे तांत्रिक व डिजिटल ऑडिट करण्याची मागणी नढे यांनी केली आहे.
प्रशासक कालावधीसह मागील तीन ते चार वर्षांत मंजूर झालेल्या सर्व बांधकाम परवानगी फायलींचे स्वतंत्र थर्ड पार्टी टेक्निकल आणि फायनान्शियल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई न करता, चौकशीत दोष आढळल्यास संबंधित वरिष्ठ अधिकारी, वास्तुविशारद आणि विकासक यांच्यावरही नियमानुसार गुन्हे दाखल करावेत, असे नढे यांनी म्हटले आहे.
महापालिकेचे कथित महसुली नुकसान संबंधित विकासक आणि दोषी अधिकाऱ्यांकडून सव्याज वसूल करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनोद नढे यांनी प्रशासनाला दिला आहे.

















