
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील गणेशम फेज-२ सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीची माहिती मिळताच नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगवान बचावकार्य करत आगीत अडकलेल्या दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका घरामध्ये दोन लहान मुली अडकल्याचे समजताच जवानांनी जीवाची बाजी लावत तत्काळ बचावकार्य सुरू केले आणि दोन्ही मुलींना सुरक्षित बाहेर काढले.
सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
या प्रसंगी नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

















