
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांनी स्वतःच्या उन्नतीसाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. मात्र, आत्मनिर्भरतेसोबतच स्वतःचा आत्मसन्मानही जपला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिका डॉ. सीमा काळभोर यांनी केले.
माई सोशल फाऊंडेशनच्या मासिक सभेत महिलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या स्वप्रगती, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. काळभोर म्हणाल्या की, स्वप्रगतीसाठी वयाची मर्यादा नसते, तर त्यासाठी जिद्द आणि इच्छाशक्ती आवश्यक असते. समाजात अनेक महिलांनी मध्यम वयातही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून पुढे जाण्याची गरज आहे.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सोनाली दीदी यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व विशद केले. तसेच निर्व्यसनी भारत घडविण्यासाठी उपस्थित महिलांना शपथ दिली.
सभेची प्रस्तावना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा काळभोर यांनी केली. संगीता भोसले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे संयोजन सोनल काळे व हमीदा शेख यांनी केले. सचिन मोकाशी व इब्राहिम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले.
– अनुराधा विशाल काळभोर
अध्यक्षा, माई सोशल फाऊंडेशन



















