
महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६ चा उत्साहात प्रारंभ; सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा करण्यात आला गौरव
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या स्वच्छतेसाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सफाई कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच शहर स्वच्छतेच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार हे सफाई कर्मचारी असून, त्यांच्या कामाचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले असून, या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मकवाना यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष धनराज बीर्दा यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपआयुक्त अण्णा बोदडे,डॉ.प्रदीप ठेंगल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड.सागर चरण, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मकवाना म्हणाले की, “महर्षी वाल्मीकी यांनी आपल्या विचारांतून समाजाला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान आणि समान संधी मिळणे आवश्यक आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सफाई कर्मचारी करत असतात. पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छतेसाठी आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि मेहनतीमुळे शहराच्या स्वच्छतेचा लौकिक वाढत आहे.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहराने राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यामागे प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याची मेहनत, समर्पण आणि सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडतानाच नागरिकांना स्वच्छतेबाबत सहकार्य केले आहे. शहराच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यात सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका मोलाची असून त्यांच्या योगदानाची महापालिकेला जाणीव आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देत महापालिकेच्या वतीने वेळोवेळी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे तसेच त्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सर्वांगीण कल्याणासाठी ओडिशा शासनाच्या ‘गरिमा’ योजनेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही स्वतंत्र योजना सुरू करण्याचे योजिले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गुरु महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत महापालिकेतील २५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या १९ कर्मचाऱ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. तसेच १७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेचा गौरव करण्यासोबतच त्यांना हक्काचे घर आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर,उप आयुक्त अण्णा बोदडे, अखिल वाल्मिकी समाज, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजेश बडगुजर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या निमित्ताने नागरिकांसाठी विशेष मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सदाबहार गीतांच्या सुरेल कार्यक्रमाने उपस्थितांना जुन्या आठवणींना उजाळा देत संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी दिली. तसेच महिलांसाठी खास लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक मराठी लोककलेचा आविष्कार आणि गीत-संगीताच्या सुरेल वातावरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.



















