
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तहकूब सर्वसाधारण सभेला नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय पुन्हा लांबणीवर पडले असून, महापालिकेची सभा आता १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १७) तहकूब सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक सभेला अनुपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला भाजपचे सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा ठराव मांडला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी ठरावाला अनुमोदन देत पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी सभागृहातील नगरसेवकांच्या कमी उपस्थितीकडे लक्ष वेधत भाऊसाहेब भोईर यांनी ‘कोरम’चा मुद्दा उपस्थित केला. “आज मोठ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात नगरसेवक उपस्थित नाहीत. कोरम पूर्ण असता तर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असती,” असे म्हणत त्यांनी सभागृह नेते प्रशांत शितोळे यांना टोला लगावला.
शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचा संदर्भ देत बारणे यांनी त्यांच्या आपुलकीच्या स्वभावाचा अनुभव सभागृहात सांगितला. “पंतप्रधान कसा असावा, याचे जिवंत उदाहरण त्यांच्या भेटीनंतर जाणवले. दुसऱ्यांदा भेटीस गेलो असता त्यांनी मला ‘या कॉर्पोरेटरजी’ असे म्हणत आपुलकीने संबोधले,” असे बारणे म्हणाले.
दरम्यान, गौरी-गणपती उत्सवामुळे नगरसेवकांची उपस्थिती कमी असल्याचे सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तहकूब सभा पुढील महिन्यात घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार महापौर रवि लांडगे यांनी सभा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केली.
सभेच्या प्रारंभी निगडी येथील मयत चिमुकली संस्कृती, जुन्नरच्या नेत्या आशा बुचके, मावळचे माजी आमदार मदन बाफना, माजी नगरसेविका फुगे यांच्यासह शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नगरसेवकांची अनुपस्थिती आणि सभा पुन्हा महिनाभरासाठी तहकूब झाल्याने विषयपत्रिकेवरील शहराच्या हिताचे निर्णय आणखी लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातील या सभेतील कमी उपस्थितीवरून महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

















