
दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागाचे भाजपचे नियोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने सप्टेंबर महिन्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी शहरात ‘आशीर्वादाचा दिवा’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात शहरातील दोन लाखांहून अधिक नागरिकांनी हातात दिवे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी शहरातील आमदार, खासदार, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रोजगार मेळावे, रक्तदान व आरोग्य शिबिरे, चित्रकला व भाषण स्पर्धा, ‘नमो सेवा गाथा’, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांच्या रील स्पर्धा, ‘सेवादीप यात्रा’, सेवा सेतू अभियान, रांगोळी स्पर्धा, विकसित भारत संकल्प यात्रा, इनोव्हेशन चॅलेंज आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘आशीर्वादाचा दिवा’ अभियानाचे शहर संयोजक म्हणून भाजपचे शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर प्रभारी भरत नाना पाटील, शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह अभियानाचे प्रमुख मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, वैशाली खाडे, महिला अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी आदींचा सहभाग राहणार आहे.
चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध मंडल अध्यक्ष, आघाड्या, मोर्चे, प्रकोष्ठ आणि पदाधिकारी या उपक्रमाच्या नियोजनात सहभागी झाले आहेत.
१७ सप्टेंबर रोजी नागरिकांनी आपल्या हातात दिवा घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
















