
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) आपल्या स्थापनेच्या ६०व्या वर्षात प्रवेश केला असून, २०२६-२७ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या महोत्सवी वर्षाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी हीरक महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
‘सुरक्षित आणि संरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे’ ही संकल्पना लोगोच्या माध्यमातून मांडण्यात आली असून, रस्ते सुरक्षा, सुरक्षित वाहतूक, तांत्रिक नवकल्पना आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्था यावर सीआयआरटीचा विशेष भर राहणार आहे.
सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुण्यातील सीआयआरटी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी वर्षाच्या मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना औपचारिक निमंत्रणपत्र आणि विशेष निमंत्रणिका प्रदान करण्यात आली.
शिष्टमंडळात सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, तांत्रिक सचिवालयाचे प्रमुख शेखर ढोले, ऑटोमोटिव्ह सायबरसुरक्षेचे प्रमुख फारुख मखदूम आणि संशोधन व सल्लागार सेवेचे प्रमुख उमेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.
हीरक महोत्सवी वर्षभरात पुण्यात भव्य उद्घाटन सोहळा, वाहनांमधील परस्पर संवाद तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय कार्यशाळा, वाहन सायबर सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच वाहन उत्पादकांसाठी चाचणी व प्रमाणन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
विद्यार्थी व नवोदित व्यावसायिकांसाठी वाहन सायबर सुरक्षा कौशल्य विकास कार्यक्रम, तांत्रिक कार्यशाळा, ज्ञानमालिका, प्रवासी सुरक्षेबाबत जनजागृती अभियान आणि रस्ता सुरक्षा महिन्याचे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. तसेच सीआयआरटीच्या सहा दशकांच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
१९६७ पासून सीआयआरटीने भारताच्या रस्ते वाहतूक क्षेत्रात वाहन चाचणी, प्रमाणन, संशोधन, सल्लागार सेवा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हीरक महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, संरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत रस्ते वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी नव्या उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.
















