
– पीएमआरडीए मुख्यालयात ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ उत्साहात साजरा
– अभियांत्रिकी विभागांच्या अधिकारी, अभियंत्यांनी घेतली एकनिष्ठतेची शपथ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्यातून, दूरदृष्टीतून आणि समर्पणातून आजच्या अभियंता पिढीने प्रेरणा घेऊन सक्षम पुणे महानगरासह राष्ट्राच्या उभारणीत आपले सर्वोच्च योगदान द्यावे, असे प्रतिपादन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण यांनी केले.
आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात आयोजित ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रारंभी रिनाज पठाण यांच्या हस्ते भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी मुख्य अभियंता (रस्ते विभाग) शिवप्रसाद बागडी, प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमान भोसले यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या अभियांत्रिकी विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अधिकारी आणि अभियंत्यांनी राष्ट्रबांधणीसाठी सदैव तत्पर राहण्याची, तसेच सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याची शपथ घेतली. अभियांत्रिकी कौशल्य, सचोटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विकसित पुणे महानगरासह राष्ट्राच्या निर्मितीसाठी ‘पीएमआरडीए’चा संपूर्ण अभियंतावर्ग सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
















