शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ आश्रमातील मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत विशेष शो!
आमदार शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रम


नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरातील अंध, दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यशील जीवनाचे दर्शन घडवण्यात आले.



आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन चित्रपटगृहात बुधवार, दि. १९ रोजी हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. शिवरायांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनदेखील संघर्ष आणि बलिदानाने भरलेले आहे. त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शिवरायांचे सुपुत्र नव्हते, तर ते एक अद्वितीय योद्धा, विद्वान आणि स्वराज्यरक्षक होते. त्यांचे जीवन धैर्य, निष्ठा आणि त्यागाचे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास आणि धैर्याने संकटांवर मात करता येते, याचे उत्तम उदाहरण संभाजी महाराजांनी घालून दिले आहे,” असे ते म्हणाले.
*विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
चित्रपटाचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्ही प्रथमच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. हा अनुभव आम्हाला अविस्मरणीय वाटतो. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्यामुळे ही संधी मिळाली. त्यांच्या आणि आयोजकांच्या मनःपूर्वक आभारी आहोत,” असे त्यांनी सांगितले. चित्रपट समाप्त होताच सर्व विद्यार्थ्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत चित्रपटगृह दणाणून सोडले.
*विशेष सहभाग*
या विशेष उपक्रमात पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्र, दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रम, रावेत येथील झुंज दिव्यांग संस्था आणि मामुर्डी येथील माई बाल भवन येथील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यासोबतच संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षकवृंदांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यात पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे, दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमाचे केंद्र प्रमुख सुरवसे साहेब, रावेत येथील झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे, मामुर्डी येथील माई बाल भवनचे प्रमुख मधुकर इंगळे आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय मराठे आणि माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांनी विशेष परिश्रम घेतले. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी लाभली.








