
‘ड्रीम इंडिया–विकसित भारत’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी रंगविले भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर्स पब्लिक स्कूलमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘ड्रीम इंडिया – विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रे साकारत तसेच वक्तृत्वातून आपल्या कल्पना व विचार प्रभावीपणे मांडले.
या उपक्रमाचे आयोजन नगरसेविका अनिता संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विकसित भारत, देशाची प्रगती, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याबाबतच्या कल्पना आपल्या चित्रांमधून व वक्तृत्वातून मांडल्या. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी प्राचार्या ज्योतिका मलकानी, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

















