
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय सिंधु सभा पुणे व पिंपरी-चिंचवड शाखेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पुण्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे सामूहिक दर्शन घेतले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने गणपती मंडप दुमदुमून गेला.
हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने केली जाते. त्याच श्रद्धेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सिंधु सभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी भारतीय सिंधु सभा पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष मनोहर जेठवानी म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेताना वेगळाच आनंद मिळतो. संपूर्ण देशावर तसेच महाराष्ट्रावर येणारी नैसर्गिक संकटे गणरायाने दूर करावीत आणि सर्वांवर कृपाआशीर्वाद ठेवावा, अशी प्रार्थना श्रीगणेशाच्या चरणी केली.”
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष तथा विश्वस्त सुनील रासने हे दरवर्षी सिंधी समाज बांधवांना गणरायाच्या दर्शनासाठी आग्रहाने निमंत्रित करतात. या निमंत्रणाचा मान ठेवून भारतीय सिंधु सभेचे पदाधिकारी व समाजबांधव गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी उपस्थित राहतात, असे जेठवानी यांनी सांगितले.
यावेळी भारतीय सिंधु सभा पुणे व पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने भगवान झुलेलाल यांची प्रतिमा देऊन सुनील रासने यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सिंधी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी सुरेश हेमनानी, श्री व सौ. गेयान रोहरा, जितेंद्र चांदवानी, अनमोल ठाकूर, मीनल ठाकूर, महेश चावलानी, अजित कंजवानी, किशन भन्साळी, संगिता सुखवानी, आरती सखरानी, हरेश मनछानी, तिलोकचंदानी, दौलत जेसवानी, मीना आनंदानी, एंशीराम हरजानी, आत्मप्रकाश मताई, मनोज लिलानी, हुंदलानी, रमेश गुरुबानी, खंडवानी यांच्यासह भारतीय सिंधु सभा पुणे व पिंपरी-चिंचवड शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















