
गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरा, आठवणी आणि वारसा राज्य शासनाच्या ‘Bappa.org’ वर नोंदविण्याचे महापौर आणि आयुक्त यांचे आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाशी जोडलेल्या आपल्या घरातील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आठवणी, परंपरा आणि सांस्कृतिक अनुभव आता डिजिटल स्वरूपात जतन करता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गणेशोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी ‘Bappa.org’ हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहराची ओळख औद्योगिक विकासासोबतच विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागामुळेही निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी कुटुंबे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्षानुवर्षे आपापल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. आरत्या, पारंपरिक प्रथा, सजावट, नैवेद्य, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बाप्पाशी जोडलेल्या कौटुंबिक आठवणी यामुळे प्रत्येकाचा गणेशोत्सव वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या विविध अनुभवांची नोंद डिजिटल माध्यमातून होणे म्हणजे शहराच्या सांस्कृतिक स्मृती जतन करण्याची एक संधी आहे.
‘Bappa.org’ या उपक्रमामध्ये नागरिकांना आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित विविध स्वरूपातील माहिती नोंदविता येणार आहे. घरातील गणपतीच्या आरत्या व पारंपरिक प्रथा, कुटुंबातील गणेशोत्सवाच्या आठवणी, पारंपरिक पाककृती, गणेशमूर्तींची छायाचित्रे, सजावटीचे फोटो व व्हिडिओ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे उपक्रम, सामाजिक कार्य तसेच उत्सवाशी संबंधित अनुभव नागरिक या माध्यमातून शेअर करू शकतात.
गणेशोत्सवाच्या प्रत्येक अनुभवामागे एखादी आठवण, एखादी परंपरा किंवा अनेक वर्षांची सांस्कृतिक परंपरा दडलेली असते. आजच्या काळातील हे अनुभव भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाचे सांस्कृतिक दस्तऐवज ठरू शकतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, कुटुंबे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि आठवणी ‘Bappa.org’ या संकेतस्थळावर नोंदवाव्यात असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा आपल्या श्रद्धेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांना जपणारा उत्सव आहे. राज्यात विविध ठिकाणी नागरिक आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवाशी जोडलेल्या आरत्या, प्रथा, आठवणी, कला आणि सामाजिक उपक्रमांची डिजिटल नोंद होणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. ‘Bappa.org’ या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवातील अशा विविध पैलूंना व्यापक व्यासपीठ मिळावे आणि हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी नागरिकांनी व गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असून, त्यामध्ये श्रद्धेसोबतच कला, लोकपरंपरा, सामाजिक सहभाग आणि सामुदायिक एकोपा यांचेही दर्शन घडते. गणेशोत्सवाशी जोडलेल्या अशाच विविध रंगांची आणि आठवणींची नोंद या राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमातून व्हावी, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन होण्यास मदत होणार आहे.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

















