
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी परिसरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत आणि रस्ते विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कथित गैरप्रकारांविरोधात सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. रस्त्यावर रांगोळी काढून त्यामधून रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले.
कुदळवाडी परिसरातील नागरिकांना खराब रस्ते, खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि अपुऱ्या रस्ते सुविधांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्यांची अवस्था सुधारत नसेल, तर या कामांची गुणवत्ता आणि निधीच्या वापराबाबत प्रशासनाने पारदर्शक माहिती नागरिकांसमोर ठेवावी, अशी मागणी मारुती जाधव यांनी केली.
“रस्ते विकासासाठी निधी येतो, कामे होतात; मात्र काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था पुन्हा खराब होते. त्यामुळे कामांची गुणवत्ता, ठेकेदारांची जबाबदारी आणि खर्च झालेल्या निधीचा हिशोब सार्वजनिक करण्यात यावा,” अशी मागणी जाधव यांनी केली.
निषेधाच्या या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाने कुदळवाडीतील रस्त्यांची तातडीने पाहणी करून निकृष्ट कामांची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
— मारुती गणपत जाधव
सामाजिक कार्यकर्ता

















