
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून पुणे मेट्रोने यंदा प्रवाशांसाठी विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेट्रो फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यात आली असून, १७ ते २४ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो रात्री दोन वाजेपर्यंत धावणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी तर सेवा रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधून पुण्यातील गणपती आणि विविध देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जातात. त्यामुळे या काळात मेट्रोवरील प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी संपूर्ण मेट्रो मार्गावर पाच मिनिटांच्या अंतराने गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची नियमित वेळ सकाळी ६ ते रात्री ११ अशी राहणार आहे. त्यानंतर १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान सकाळी ६ ते रात्री दोन वाजेपर्यंत सेवा उपलब्ध असेल.
अनंत चतुर्दशीला म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून २६ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रोची सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून पुन्हा सकाळी ६ ते रात्री ११ ही नियमित वेळ लागू होईल.
गणपती दर्शनासाठी स्थानकांची निवड करताना भाविकांनी गर्दीचे नियोजन लक्षात घेण्याचे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रवाशांनी गणपती दर्शनासाठी कसबा पेठ स्थानकाचा वापर करावा. वनाजच्या दिशेने येणाऱ्या भाविकांनी डेक्कन जिमखाना, तर रामवाडीच्या दिशेने येणाऱ्यांनी पुणे महापालिका भवन स्थानकावर उतरावे.
महात्मा फुले मंडई स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी हे स्थानक मुख्यतः परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान मंडई स्थानकातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरातील गेट क्रमांक तीनमधून प्रवेश, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर येऊन मार्गिका बदलण्याचे टाळावे, असेही प्रशासनाने सांगितले आहे. त्याऐवजी कसबा पेठ, पीएमसी आणि संभाजी उद्यान या स्थानकांचा प्रवाशांनी आपल्या मार्गानुसार वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
















