
महादेव मंदिर परिसरातील घाटाच्या कामासह पावसाच्या पाण्याच्या समस्येची पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील विविध नागरी समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून समस्यांचा आढावा घेतला. महादेव मंदिर परिसरातील घाटाची उंची वाढविण्याच्या कामासह परिसरातील रस्ते, अडथळे आणि पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पाहणी करण्यात आली.
महादेव मंदिर परिसरातील घाटाची उंची वाढविण्याचे काम सुरू असून, त्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. कामाची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर रहाटणी ‘ग’ प्रभाग तसेच रहाटणी-पिंपळे सौदागर ‘ड’ प्रभागातील विविध ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली.
पावसाचे पाणी घरात शिरण्याची समस्या गंभीर
पिंपळे सौदागर परिसरातील लोढे वस्तीमध्ये पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याची समस्या समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपापल्या समस्या आणि अडचणी लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या.
दरम्यान, दत्त मंदिर परिसर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडई परिसरातील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बाप्पू) काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे, नगरसेविका कुंदा संजय भिसे आणि ड प्रभाग (देवगिरी) अध्यक्षा तथा नगरसेविका सविता खुळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
















