
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उद्योग आघाडीच्या शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश (दादा) लांडगे यांच्या हस्ते नवनियुक्त सात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे शहरातील युवकांना उद्योग, व्यवसाय आणि स्टार्टअप क्षेत्राशी जोडण्याबरोबरच संघटनात्मक कार्याला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
भाजयुमो उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा नियुक्ती सोहळा पार पडला. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेश सचिव अजित कुलथे आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष राऊत आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड जिल्हा सचिव गिरीष देशमुख उपस्थित होते.
शहर सचिवपदी चौघांची नियुक्ती
शहर सचिवपदी प्रविण व्यंकट रणखांबे, विजय प्रल्हाद सोनवणे, आकाश नानासाहेब मोरे आणि अभिषेक संभाजी बामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर उपाध्यक्षपदी तिघांची निवड
शहर उपाध्यक्षपदी शिवदत्त राजेश जाधव, अजय संभाजी बामणे आणि दीपराज सतीश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उद्योजकतेला चालना देण्याचे आवाहन
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना आमदार महेश लांडगे यांनी युवकांना उद्योग आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी औद्योगिक नगरीतील युवकांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवनियुक्त कार्यकारिणी शहराच्या विकासासह संघटनात्मक बळकटीसाठी काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्त्यांनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रांतून अभिनंदन केले जात आहे. युवकांना उद्योग-व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे आणि त्यांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणे, ही या आघाडीसमोरील महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.



















