
वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान
ज्ञान, विचार आणि बातम्या घराघरांत पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टांना सलाम – काशिनाथ नखाते
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहाटेच्या अंधारात दिवसाची सुरुवात करून ऊन, वारा, पाऊस आणि थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत न थांबता वाचकांच्या घरापर्यंत वर्तमानपत्रे पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजात ज्ञान, विचार, माहिती आणि जनजागृती पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे कष्टकरी विक्रेते प्रामाणिकपणे करत असतात. त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे आणि त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरातील वृत्तपत्र विक्रेते शुभांगी ढवळशंक, लता गोरे, नाना खटोकर आणि राजेंद्र कासट यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांसह महासंघांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पूर्वी सायकलवरून आणि बदलत्या काळानुसार आता दुचाकीवरून वृत्तपत्र वितरण करणारे विक्रेते अनेक वर्षांपासून ही सेवा अखंडपणे देत आहेत. डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असतानाही मुद्रित वर्तमानपत्रांची परंपरा जपण्यात आणि वाचकांपर्यंत बातम्या वेळेवर पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, या कामामागील मेहनत, वेळेची बंधने आणि प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणे आवश्यक असल्याचे नखाते यांनी नमूद केले.
“वृत्तपत्र विक्रेते हे केवळ वर्तमानपत्रे घराघरांत पोहोचवणारे कामगार नाहीत, तर समाजापर्यंत ज्ञान, विचार आणि लोकशाहीचा आवाज पोहोचवणारे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या श्रमांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. त्यांना सामाजिक सुरक्षा, न्याय्य हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी संघर्ष महासंघाचा लढा यापुढेही अविरत सुरू राहील, अशी ग्वाही काशिनाथ नखाते यांनी दिली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष इरफान चौधरी,महिला अध्यक्षा वृषाली पाटणे,अ प्रभाग अध्यक्ष सहदेव होनमाने, सुशेन खरात, मनोज यादव, लाला राठोड ,अंबालाल सुकवाल आदी उपस्थित होते.



















