
मंडईतील बोगस लाभार्थ्यांना गाळेवाटपाचा प्रयत्न हाणून पाडा! — काशिनाथ नखाते
प्रामाणिक विक्रेत्यांचा ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयावर हल्लाबोल
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या घरकुल परिसरातील मंडईत मूळ आणि प्रामाणिक विक्रेत्यांना डावलून आर्थिक हितसंबंधातून कथित बोगस लाभार्थ्यांना गाळेवाटप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने केला आहे. या कथित गैरप्रकाराला विरोध करण्यासाठी महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयावर महासंघाच्या वतीने धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
चिखली प्राधिकरणातील घरकुल परिसरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२१ मध्ये सेक्टर क्रमांक १७ आणि १९ येथे बसथांब्याजवळ सुमारे ७२ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. या ठिकाणी अनेक वर्षांपासून विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, परिसरात चिखल साचणे, साप निघणे आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होणे यामुळे विक्रेत्यांनी संबंधित जागेचे काँक्रीटीकरण करण्यासह परिसराची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार काम झाल्यानंतर आता विक्रेत्यांचे पुनर्वसन करताना २१ प्रामाणिक विक्रेत्यांना बाजूला सारून २५ कथित बोगस विक्रेत्यांचा समावेश करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला आहे.
पुढे नखाते म्हणाले की, संबंधित गाळेवाटपात पारदर्शकता आणि कायदेशीर नियमांचे पालन झालेले नाही. ठेकेदार आणि विशिष्ट व्यक्तींशी संगनमत करून पात्र नसलेल्या व्यक्तींना गाळे देण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच, एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना गाळे देण्याचा प्रयत्न झाल्याबाबत लेखी आक्षेप नोंदवल्यानंतर संबंधित नावे वगळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
गाळेवाटपासाठी चिठ्ठ्या काढण्याच्या प्रक्रियेवरही नखाते यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ठराविक व्यक्तींनाच पसंतीचे गाळे मिळावेत, अशा पद्धतीने चिठ्ठ्यांचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप करत या प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. पात्र विक्रेत्यांची यादी, गाळेवाटपाचे निकष आणि चिठ्ठ्या काढण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे जाहीर करावी, अशी भूमिका विक्रेत्यांनी मांडली.
या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी विक्रेते ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात पोहोचले असता, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या प्रश्नांना सामोरे न जाता कार्यालयातून निघून गेल्याचा आरोप काशिनाथ नखाते यांनी केला आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणात लपवाछपवी व मौन न बाळगता आरोपांबाबत स्पष्ट उत्तर द्यावे आणि पात्र विक्रेत्यांवर अन्याय होणार नाही, याची खात्री द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी युवाअध्यक्ष सूरज देशमाने,कार्याध्यक इरफान चौधरी, सहदेव होणामणे,नंदा तेलगोटे,शारदा राक्षे, अंजू तायडे, संगीता खरात, सुरेखा जाधव, जयश्री पाटील,सविता हिंगणकर,पूजा गायकवाड, सीमा गायकवाड,अलका सूर्यवंशी ,रत्नप्रभा गायकवाड,अशोक कोटमाळे, बशीर शेख,भगवान तेलगोटे, यांचे सह विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले.



















