
दिवेआगर दुर्घटनेतील ८ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; Winners Academy तात्पुरती बंद करून दोषींवर कठोर कारवाई करा – डॉ. धम्मरत्न गायकवाड
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी आळंदी येथील Winners Academy च्या सहलीदरम्यान ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत ८ निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित संस्था, आयोजक व पर्यवेक्षकांवर असते. त्यामुळे सहलीचे नियोजन, विद्यार्थ्यांची देखरेख, सुरक्षा व्यवस्था आणि समुद्रकिनारी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, याची निष्पक्ष व सखोल चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पिंपरी-चिंचवड शहर युवक आघाडीचे युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड यांनी केली आहे.
डॉ. गायकवाड म्हणाले, “आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Winners Academy चे कामकाज तात्पुरते बंद करण्यात यावे. चौकशीत निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास अकॅडमीचे चालक-मालक व संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कठोर कारवाई व अटक करण्यात यावी.”
तसेच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी खासगी क्लासेस व शैक्षणिक संस्थांच्या सहलींसाठी कठोर सुरक्षा नियम लागू करण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
“विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही डॉ. गायकवाड यांनी दिला.

















