
शोकाकुल वातावरणात विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिवेआगर समुद्र दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांवर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि कैवल्य सतीश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदीजवळील केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यश किरण वानखेडे (अमरावती) आणि कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.
आळंदी स्मशानभूमीत एकाच वेळी चार विद्यार्थ्यांच्या चिता जळत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. या घटनेने आळंदी आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी आळंदीतील संबंधित क्लासच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

















