
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी येथील जयमाला सोसायटी परिसरातील गीता गॅरेजला आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका छोट्याशा ठिणगीतून सुरू झालेली आग काही वेळातच भडकली आणि तिचा परिणाम संपूर्ण पाच मजली इमारतीपर्यंत झाला. या दुर्घटनेत गॅरेज मालक प्रदीप परदेशी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, इमारतीतील इतर रहिवाशांच्याही घरांचे व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
गॅरेजच्या वरील पहिल्या मजल्यावर राहणारे राजेंद्र चोपडे यांच्या घरातील फर्निचर, बेडरूममधील साहित्य व इतर वस्तू जळून नुकसान झाले. घरातील एसीचा स्फोट झाल्याचीही माहिती आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावरील काळे साहेब आणि तिसऱ्या मजल्यावरील राजेंद्र भिलारे यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एका लहान चिमुरडीच्या हाताला आगीची झळ बसल्याची बाब चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी सारंग सर, जवान जयपाल पाटील साहेब आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. विशेषतः जवान जयपाल पाटील साहेब यांनी धाडसाने घरात प्रवेश करून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व नुकसानग्रस्त कुटुंबीयांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी डॉ. धम्मरत्न गायकवाड हेही जयपाल पाटील साहेब यांच्या समवेत घरामध्ये गेले होते. घरातील जळालेले फर्निचर, संसारोपयोगी साहित्य आणि झालेली हानी प्रत्यक्ष पाहून त्यांनी बाधित कुटुंबीयांना आधार दिला.
अग्निशमन दलाच्या तत्पर कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. या धाडसी व माणुसकीपूर्ण कार्याबद्दल डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान आणि संपूर्ण पथकाचे आभार मानले आहेत.
या दुर्घटनेमुळे बाधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. गॅरेजमधील साहित्याचे नुकसान तसेच घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संसारोपयोगी वस्तू जळाल्याने संबंधित कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. धम्मरत्न शक्तिगुप्त गायकवाड यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन, मा. आयुक्त साहेब आणि संबंधित लोकप्रतिनिधींना कळकळीचे आवाहन केले आहे की, या दुर्घटनेची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्तांचे अधिकृत पंचनामे करावेत. गॅरेज मालक आणि बाधित घरमालकांच्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन करून शासन व महानगरपालिकेच्या लागू नियमांनुसार आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच आगीची झळ बसलेल्या चिमुरडीसह बाधित कुटुंबांना आवश्यक ती मदत मिळवून द्यावी.
“या कुटुंबांचे नुकसान केवळ आर्थिक नसून त्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या संसारालाही मोठा धक्का बसला आहे. अशा संकटाच्या वेळी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन बाधित कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,” असे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले.

















