
८ दुर्दैवी विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार
आळंदी पंचक्रोशी परिसर शोकाकुल
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर भरतीचा व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पुण्यातील ‘विनर्स अकॅडमी फॉर ११th अँड १२th’ या कोचिंग क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक आणि अत्यंत वेदनादायी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आळंदी शहर व परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.
महाद्वार चौक, भराव रस्ता बाजारपेठ, वडगाव रस्ता, मरकळ रोड, प्रदक्षिणा मार्ग, नगरपालिका चौक, शिवतेज चौक, इंद्रायणी नदी घाट परिसर आणि चाकण चौक येथील सर्व व्यापारी, व्यावसायिक, संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभाग नोंदवला.
नातेवाईकांची आळंदी पोलीस ठाण्यात गर्दी
घटनेची माहिती मिळताच काल रात्रीपासून विनर्स अकॅडमी येथे आणि आज पहाटेपासूनच आळंदी पोलीस ठाण्यामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दिवेआगर येथून गुरुवारी रात्री उशिरा निघालेली सहलीची बस आज शुक्रवारी सकाळी आळंदीत पोहोचली. बस दाखल होताच आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह एकापाठोपाठ एक आळंदीत आणले जात असताना उपस्थित सर्वांचाच धीर सुटला. अनेक नागरिक आणि मित्र मयत विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना सर्वांच्याच डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
केळगाव व आळंदी परिसरात आज सकाळी क्रमाक्रमाने रुग्णवाहिकांमधून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह आणण्यात आले. यातील केळगाव येथील २ आणि आळंदी येथील २ अशा एकूण ४ विद्यार्थ्यांवर सकाळी १० वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अंत्यविधीसाठी आळंदी आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. निष्पाप ८ मुलांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण आळंदी परिसर शोकसागरात बुडाला आहे.

















