
सहा वर्षांची सेवा अखंडित; दोन विसर्जन हौदांसह नागरिकांसाठी विविध सुविधांची व्यवस्था
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवातील दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पिंपरी येथे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जन व संकलन केंद्रावर भक्तीमय वातावरणात पार पडले. नागरिकांनी मोठ्या संख्येने या केंद्राचा वापर करून आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
गेल्या सहा वर्षांपासून संदीप वाघेरे यांच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जन व संकलन केंद्राचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा मिळावी, यासाठी केंद्रावर दोन स्वतंत्र विसर्जन हौद उभारण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्ती संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आरतीची विशेष व्यवस्था, साउंड सिस्टीम, पिण्याचे स्वच्छ पाणी, पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्य संकलन, कचरा संकलन तसेच दिशादर्शक फलकांची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वयंसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली होती.
दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनाला प्राधान्य दिले. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांना स्वयंसेवकांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे विसर्जन प्रक्रिया कोणतीही गैरसोय न होता शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
नागरिकांकडून संकलित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. नदी, नाले किंवा अन्य जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित न करता संकलन केंद्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“गणेश भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान राखत सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू असून, दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन भक्तीमय वातावरणात पार पडले. आगामी विसर्जनाच्या दिवसांतही नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले.

















