
“पर्यावरणपूरक विसर्जनासोबत मूर्तीदानातून अनाथ मुलांच्या शिक्षणाला मदत”
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, या भक्तीसोबत पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच सामाजिक आणि पर्यावरणपूरक विचारातून विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने वाकड येथे पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जन घाट २०२६ उभारण्यात आला आहे.
द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ, कस्तुरी चौक, हिंजवडी रोड, वाकड येथे उभारण्यात आलेला हा घाट १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत गणेशभक्तांसाठी उपलब्ध राहणार आहे.
या घाटावर ५ फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची तसेच मूर्तीदानाची सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदी, नाले, ओढे व विहिरी यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन होऊन जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, तसेच पर्यावरणाची हानी टाळता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
मूर्तीदानातून पर्यावरणासोबत समाजसेवेचा हातभार
या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे घाटावर विसर्जित अथवा दान केलेल्या गणेशमूर्तींचे श्री फाऊंडेशन पुणे या संस्थेमार्फत संकलन करण्यात येणार आहे. या मूर्तींचे पुनःशृंगार करून त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग केला जाणार आहे.
तसेच मूर्तीदान योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीद्वारे अनाथ मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळे एका गणेशमूर्तीच्या विसर्जनातून पर्यावरणाचे संवर्धन आणि समाजातील गरजू मुलांच्या भविष्यासाठी मदत, असा दुहेरी सामाजिक संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
घाटावर भाविकांसाठी आरती व्यवस्था, निर्माल्य कुंड, प्रकाश व्यवस्था यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वाकड, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या घरगुती, सोसायटीतील तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या शाडू मातीच्या आणि POPच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने याच घाटावर करावे, असे आवाहन विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी गुलाल व रंगांचा वापर टाळावा, निर्माल्य केवळ निर्माल्य कुंडात जमा करावे आणि प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
“गणरायावरील आपली श्रद्धा ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता ती समाज आणि पर्यावरणाप्रतीच्या आपल्या जबाबदारीतूनही दिसली पाहिजे. भक्ती जपत पर्यावरणाचे रक्षण आणि मूर्तीदानातून गरजू मुलांच्या शिक्षणाला हातभार, हा संदेश घेऊन विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि वाकड परिसरातील प्रत्येक गणेशभक्ताने या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ अधिक व्यापक करावी.”
श्री. विशाल शंकर वाकडकर
(प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार)
















