
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासोबतच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहराच्या विविध भागांत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानांतर्गत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २३ मधील यशवंतराव चव्हाण विद्यालय, थेरगाव येथे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू माती व नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागाचा संदेश देण्यावर महापालिकेचा भर आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाडू माती तसेच नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार केल्या तसेच, यावेळी पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून सजावट करण्याचे आवाहन करण्यात आले. कागद, कापड, बांबू, पाने आणि नैसर्गिक फुलांचा वापर करून सजावट करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. तसेच थर्माकोल आणि एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली.
“गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारीही आपली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक सजावट आणि प्लास्टिकमुक्त उत्सवाचा संदेश घराघरांत पोहोचण्यास मदत होईल. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पुढील पिढीवरही होईल,” असे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
यावेळी सहा.आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गोपाल धस, आरोग्य सहाय्यक सचिन उघडे तसेच मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर हे देखील उपस्थित होते.
















