
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कृष्णानगर येथील सचिन गृह संकुल, सेंट अँन स्कूलच्या शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरभोवती मोठ्या प्रमाणात वेली वाढल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रान्सफॉर्मर अक्षरशः वेलींनी झाकला गेला असून, “हा ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?” असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती गणपत जाधव यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात वेलींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणा झाकली गेल्याने संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ट्रान्सफॉर्मरच्या अगदी जवळ सेंट अँन स्कूल असल्याने दररोज विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.
महावितरण आणि महापालिकेच्या उद्यान विभागाने अद्याप याची गांभीर्याने दखल का घेतली नाही? दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जाधव यांनी घटनास्थळी “ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?” अशा आशयाचा बॅनर लावून निषेध व्यक्त केला. तसेच ट्रान्सफॉर्मरवरील वेली तातडीने हटवाव्यात, परिसराची स्वच्छता करावी आणि विद्युत यंत्रणेची सुरक्षितता तपासावी, अशी मागणी केली.
“बिजलीनगरसारखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? एखाद्या नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल करत जाधव यांनी महावितरण व महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
“दुर्घटना होण्याची वाट पाहू नका; आधीच उपाययोजना करा!” असा इशारा मारुती गणपत जाधव यांनी दिला आहे.














