
पद व पुरस्काराने व्यक्ती मोठी होत नाही; व्यक्तीमुळे पद व पुरस्कार मोठे होतात’ — डॉ. भारती चव्हाण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टाटा मोटर्समधील प्रदीर्घ सेवेतून ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झालेले डॉ. नंदकुमार धुमाळ यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवाभावी शिक्षक व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. मानिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा शरद जोशी मंचच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी डॉ. भारती चव्हाण यांनी डॉ. नंदकुमार धुमाळ यांच्या कार्याचे कौतुक करताना, “डॉ. धुमाळ यांनी आपली सेकंड इनिंग पूर्ण ताकदीने सुरू करावी. त्यांना ‘ॲपल मॅन’ म्हणून जगभरात ओळखले जाते. समाजाने आपल्या कार्याची दिलेली पावती ही पुढील कार्यासाठी नवे प्रोत्साहन देणारी असते,” असे सांगितले.
“पद आणि पुरस्कारामुळे व्यक्ती मोठी होत नाही; तर त्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे पद आणि पुरस्कार मोठे होतात,” असेही डॉ. चव्हाण यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. नंदकुमार धुमाळ यांचा पगडी परिधान करून डॉ. भारती चव्हाण यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. धुमाळ यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव आणि पुढील सामाजिक वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले.शिक्षक दिनाच्या निमित्ताने सेवाभावी शिक्षक तसेच पत्रकारांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

















