
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला, तरी लवकरच भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याचा स्पष्ट संदेश त्याने दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे आयोजित श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवादरम्यान उपस्थित हजारो चाहत्यांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने आपल्या कमबॅकचे संकेत दिले. त्यामुळे ‘SKY’च्या पुनरागमनाची चाहत्यांना पुन्हा उत्सुकता लागली असून, त्याच्या या वक्तव्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक योगेश लांडगे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकुमार यादव याला विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात, विशेषतः भोसरी नगरीत दाखल झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
भोसरीतील दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी सूर्यकुमार यादवचे आगमन होताच हजारो चाहत्यांनी ‘SKY… SKY… SKY…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ढोल-ताशांचा गजर, दहीहंडीचा उत्साह आणि आपल्या लाडक्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी जमलेली गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार महेश लांडगे आणि नगरसेवक योगेश लांडगे यांनी सूर्यकुमार यादवचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.
‘ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी’
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा योग आल्याचे सांगत सूर्यकुमार यादवने पुणे-पिंपरी-चिंचवड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असल्याचे म्हटले. मुंबईतून पिंपरी-चिंचवडपर्यंतचा प्रवास पावसाळी वातावरणातही जलद, सुखकर आणि आनंददायी झाल्याचे सांगताना त्याने मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद झाल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी सूर्यकुमार यादवने आमदार महेश लांडगे यांच्या कार्याचेही कौतुक केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे काम करणाऱ्या महेशदादांचे आभार मानण्यासाठी आपण आलो असल्याचे त्याने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य असल्याचे सांगत सूर्यकुमार म्हणाला की, महेश लांडगे यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. जन्मापासूनच मुंबईत वास्तव्यास असल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रचंड श्रद्धा असल्याचेही त्याने नमूद केले.
‘देशासाठी खेळायचं आणि जिंकायचं’..
सध्याच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत सूर्यकुमार यादवने देशातील नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी संदेश दिला. सध्या क्रिकेटसोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये युवा खेळाडू उत्तम कामगिरी करत असून, ऑलिम्पिक, एशियाड आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावत आहेत, असे त्याने सांगितले. ‘देशासाठी आपल्याला खेळायचंय आणि जिंकायचंय’ ही जिद्द मनात ठेवून प्रत्येक खेळाडूने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही त्याने दिला. तसेच, दहीहंडीच्या निमित्ताने भारतीय सण आणि उत्सवांबद्दलही सूर्यकुमार यादवने आपले मत व्यक्त केले. भारतातील सण, उत्सव आणि परंपरा यांचे प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी अतूट नाते आहे. त्यामुळे देशात असो किंवा परदेशात, आपण आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत सण मोठ्या आनंदाने साजरे करतो, असे त्याने सांगितले. आपले सण, उत्सव आणि परंपरा हीच आपल्या भारताची अस्मिता आहे, असेही सूर्यकुमार यादवने यावेळी नमूद केले.
देशाचे नाव जगभरात उंचावणारा खेळाडू कुस्ती आणि कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या पैलवानांच्या भोसरी नगरीत आला, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. सूर्यकुमार यादव यांच्यासारखे खेळाडू हे खऱ्या अर्थाने देशाचे ‘रिअल हिरो’ आहेत. सूर्यकुमार यादवने आपल्या खेळाच्या माध्यमातून देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्याचे भोसरीत स्वागत करणे हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

















