
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे उत्साहात पार पडला. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2, रिजन 3 आणि लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात २९ लायन्स क्लबच्या माध्यमातून ५२ शाळांमधील ६० शिक्षक-शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF लायन श्रेयश दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षा ला. डॉ. सौम्या साबळे-गभाले यांनी शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन केले. यावेळी डॉ. विठ्ठल वाघ यांनी आईप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत विविध उदाहरणांतून शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले.
लायन श्रेयश दीक्षित यांनी “शिक्षकांचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान” अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठ, विवेकी आणि चिकित्सक विचारांची जडणघडण करण्यासाठी शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन मुरलीधर साठे, रिजन चेअरमन लायन सलीम शिगलगार, डिस्ट्रिक्ट पीआरओ लायन रवी सातपुते यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ला. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले, तर ला. रवी सातपुते यांनी आभार मानले.
ज्ञानदानाच्या कार्याला समर्पित शिक्षकांचा सन्मान करून लायन्स क्लबने शिक्षक दिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम केला.

















