
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १८, मौजे चिंचवड येथील नदीलगतच्या १८ मीटर रुंद रस्त्याची तातडीने लेव्हल करून त्यावर जीएसबीचा थर टाकण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १८ मधील नदीलगतच्या १८ मीटर रुंद रस्त्यावर सध्या रस्ता अविकसित असून, या ठिकाणी नागरिक घसरून पडत आहेत. तसेच रस्ता लेव्हलमध्ये नसल्याने लहान चारचाकी वाहने जमिनीत रुतून अडकत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या रस्त्याची सद्यस्थिती लक्षात घेता नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी रस्ता तातडीने लेव्हल करून जीएसबीचा थर टाकून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सुरेश भोईर यांनी केली आहे.या मागणीचे निवेदन महापालिकेच्या स्थापत्य विभागातील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या कामाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा भोईर यांनी व्यक्त केली आहे.

















