
आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये बंद पडलेले महापालिकेचे ‘महिला समुपदेशन केंद्र’ तात्काळ पुन्हा सुरू करावे, अशी मागणी वीरांगणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राजश्री जायभाय यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटना सातत्याने समोर येत आहेत. १६ मे २०२५ रोजी वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२६ रोजी वाकड परिसरात १७ वर्षांचा संसार असलेल्या शिल्पा गवारे यांनीही हुंड्यासाठी होणाऱ्या कथित छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनांमुळे महिलांना संकटाच्या काळात वेळीच समुपदेशन, कायदेविषयक मार्गदर्शन आणि मानसिक आधार मिळणे आवश्यक असल्याचे जायभाय यांनी निवेदनात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २०२० पर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने महिला समुपदेशन केंद्र चालविण्यात येत होते. कोरोना काळात हे केंद्र बंद करण्यात आले. मात्र, कोरोना कालावधी संपल्यानंतरही हे केंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.
या केंद्रामध्ये वैवाहिक वाद, हुंड्याचा छळ, कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या समस्यांवर महिलांना मोफत समुपदेशन आणि कायदेविषयक मदत उपलब्ध करून दिली जात होती. केंद्र बंद असल्याने अनेक महिलांना आपल्या तक्रारींसाठी थेट पोलीस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे भीती, संकोच किंवा कौटुंबिक दबावामुळे काही महिला तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
२०२० मध्ये बंद पडलेले महिला समुपदेशन केंद्र आठ दिवसांच्या आत पुन्हा सुरू करावे.महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये एक महिला समुपदेशक, एक महिला वकील आणि एक महिला पोलीस अधिकारी नियुक्त करावा.
पीडित महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी २४ तासांची महिला हेल्पलाईन सुरू करावी.महिलांनी कौटुंबिक वाद, छळ अथवा अत्याचारामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून समुपदेशन केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्र सुरू करावे. आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास महिला संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजश्री जायभाय यांनी दिला आहे.

















