
“केवळ आश्वासने नकोत, सुविधा द्या!” हिंजवडीत हजारो आयटीयन्स रस्त्यावर
साडेतीन किलोमीटरचा मूक मोर्चा; वाहतूक कोंडी, खड्डे, ड्रेनेज, पाणी आणि मेट्रोच्या रखडलेल्या कामांवर प्रशासनाला इशारा
हिंजवडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांनी आयटी कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि कामगार त्रस्त झाले आहेत. अरुंद रस्ते, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, खड्डे, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी तसेच मेट्रोच्या रखडलेल्या कामांसह विविध नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (दि. ६) हजारो आयटी कर्मचारी, नागरिक, महिला, कामगार, विद्यार्थी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले.
‘स्मार्ट आयटी सिटी संकल्प’ या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या या मूक मोर्चातून प्रशासनाला स्पष्ट संदेश देण्यात आला. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील फेज-१ मधील विप्रो सर्कलपासून सकाळी सुमारे अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. सुमारे साडेतीन किलोमीटर अंतर हजारो नागरिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पायी चालत प्रशासनाचे लक्ष वेधले.
सोसायटी फेडरेशन संघटना आणि आयटी एम्प्लॉइज फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांचे फलक हातात घेऊन आयटी कर्मचारी व नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
“आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष सुविधा द्या,” अशी भावना मोर्चात सहभागी झालेल्या अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. हिंजवडी आयटी पार्कमधून मोठ्या प्रमाणात करसंकलन होत असताना त्या तुलनेत मूलभूत नागरी सुविधा मात्र अपुऱ्या असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. आयटी पार्कमधून सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे करसंकलन होत असल्याचा दावा करत, एवढा महसूल मिळत असतानाही हिंजवडीतील रस्ते, वाहतूक, पाणी, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
अपघातांची मालिका थांबणार कधी?
हिंजवडीतील खराब रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता मोर्चातील सहभागीांनी व्यक्त केली. “आणखी एक अपघात, आणखी एक बळी… हे थांबणार तरी कधी?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली.
दरम्यान, आयटीयन्सचा आवाज आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्या असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले. दीड महिन्यात भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, तसेच वर्षभरात रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुन्हा आयटी कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आयटी अभियंत्यांच्या मूलभूत प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी आयटी अभियंत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी नमूद केले.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो नागरिक सहभागी असूनही मोर्चा अत्यंत शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हिंजवडीला ‘स्मार्ट आयटी सिटी’चा दर्जा देण्याच्या घोषणा अनेकदा झाल्या; आता घोषणांपेक्षा प्रत्यक्ष सुविधा आणि ठोस कामे दाखवा, अशी मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली.

















