
सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा भावपूर्ण सोहळा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या विद्यार्थिनी व शिक्षिकांनी औंध मिलिटरी स्टेशन येथे भारतीय जवानांसोबत रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा केला.
देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या वीर जवानांच्या मनगटावर विद्यार्थिनींनी प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक असलेली राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यार्थिनींनी जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम केला.
यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून जवानांचे आभार व्यक्त केले. “आपण आज आपल्या घरात आणि शाळेत सुरक्षितपणे जीवन जगत आहोत, कारण आपल्या वीर जवानांमुळे देश सुरक्षित आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे आणि त्यागामुळे आम्हाला सुरक्षित वातावरण मिळते. त्याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी राहू,” अशा भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
या विशेष उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष संदीप काटे आणि प्राचार्या ज्योतिका मल्कानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच शाळेच्या शिक्षिका कार्तिकला गायकवाड आणि सरोज तायडे यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हा अविस्मरणीय अनुभव विद्यार्थिनींसाठी केवळ रक्षाबंधनाचा उत्सव नव्हता, तर देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता, आदर आणि राष्ट्रभक्ती व्यक्त करण्याचा एक भावपूर्ण क्षण होता.
या सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी कर्नल जितीन थॉमस आणि लेफ्टनंट कर्नल नीरज थापा यांचे चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरतर्फे मनःपूर्वक आभार. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थिनींना आपल्या शूर जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याची अनमोल संधी मिळाली.

















