
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे क्षुल्लक वादातून झालेल्या हिंसक हल्ल्यात केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा मुख्य प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर आवाहन करत, “सांगली हत्याकांडावरून राजकारण न करता समाजाच्या संतापाची भावना समजून घ्या,” असे म्हटले आहे.
सांगलीतील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या प्रवृत्तींचा कठोर शब्दांत निषेध झाला पाहिजे आणि दोषींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी समाजाची अपेक्षा आहे, असे दुर्गे यांनी सांगितले.
या घटनेच्या निषेधार्थ सांगली येथे झालेल्या मोर्चात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यांच्या वक्तव्याच्या भाषेवर मतभेद असू शकतात; मात्र त्यामागील भावना ही गुन्हेगारीविरोधात समाजात निर्माण झालेला संताप आणि अशा घटनांना आळा I’ve पाहिजे, हीच होती, असे दुर्गे यांनी स्पष्ट केले.
‘हा संघर्ष लांडगे विरुद्ध सुळे असा नाही’
“सुप्रिया सुळे यांनी महेश लांडगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांना आवरण्याचे आवाहन केले. मात्र हा विषय महेश लांडगे विरुद्ध सुप्रिया सुळे असा वैयक्तिक संघर्ष करण्याचा नाही. हा प्रश्न सांगलीतील निरपराध दाम्पत्याच्या हत्येचा आहे. पीडित कुटुंबाला न्याय कसा मिळणार आणि आरोपींना कठोर शिक्षा कशी होणार, यावर सर्वांनी बोलण्याची गरज आहे,” असे दुर्गे म्हणाले.
“पहिला वार माझ्यावर करा” असे आव्हान देण्याऐवजी आपण सर्वांनी एकत्र येऊन “पहिला वार कोणत्याही निष्पाप नागरिकावर होऊ देणार नाही,” अशी भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
गुन्हेगाराला धर्म नसतो; निरपराधांविरुद्ध द्वेष नको
या घटनेतील आरोपीच्या धर्माच्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरविणे मान्य नसल्याचे दुर्गे यांनी स्पष्ट केले. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याचा धर्म पाहून गुन्ह्याचे समर्थन किंवा विरोध होता कामा नये. तसेच हत्याकांडाचा निषेध करताना कोणत्याही धर्मातील निरपराध नागरिकांविरुद्ध द्वेष निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांचा आक्षेप महेश लांडगे यांच्या आक्रमक भाषेला आहे की हत्याकांडानंतर समाजात निर्माण झालेल्या संतापालाही आहे, असा सवालही दुर्गे यांनी उपस्थित केला.
‘लांडगे यांना आवरण्यापेक्षा गुन्हेगारी प्रवृत्तीला आवरा’
“महेश लांडगे यांना ‘आवरा’ असे आवाहन करण्यापेक्षा गुन्हेगार प्रवृत्तीला आवरा, समाजात हिंसा निर्माण करणाऱ्या मानसिकतेला आळा घाला आणि निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर व्यवस्था उभी करा, असे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाला केले पाहिजे,” अशी भूमिका राजाभाऊ दुर्गे यांनी मांडली.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे न्याय, कायदा, बंधुता आणि सामाजिक सलोखा कायम राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
केसरेकर दाम्पत्याला खरी श्रद्धांजली म्हणजे दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाज व प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे होय, अशी भूमिका दुर्गे यांनी शेवटी व्यक्त केली.

















