
भावपूर्ण वातावरणात अश्रूनयनांनी कानबाई मातेला निरोप
– ‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ उत्साहात संपन्न!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “खानदेशातील माता कानबाई उत्सवाच्या माध्यमातून आपली परंपरा आणि आपला इतिहास आई-वडील आपल्या मुलांना देत असतात. हा वारसा आणि आपला इतिहास पुढील पिढीला देणे अत्यंत आवश्यक असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो अतिशय सुंदररीत्या दिला जात आहे.” संस्कृती आणि परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती असल्याचे गौरोद्वार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खान्देशची संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित तिसऱ्या ‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात, चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात माता कानबाईला निरोप देत उत्साहात व भावूक वातावरणात संपन्न झाली.
या महोत्सवाच्या प्रास्ताविकात संयोजन समितीचे प्रमुख नामदेव ढाके यांनी उपस्थितांचे स्वागत करून महोत्सवाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
खानदेशातून येऊन शहरी भागात संस्कृती जपणे अभिमानाची बाब: वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
या सोहळ्यात आपले विचार मांडताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, “खानदेशातून येऊन शहरी भागात आपली संस्कृती जपणे अत्यंत अभिमानाची बाब आहे. माता कानबाई ही खानदेशातील कुलस्वामिनी असून, तिचा जागर करून शहरी भागातील पुढील पिढीपर्यंत तिची महती पोहोचवणे कौतुकास्पद आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार असून, एवढ्या दूर राहूनही आपल्या मातीची परंपरा येथील बांधवांनी कायम राखल्याचा विशेष आनंद आहे.”
आमदार शंकर जगताप यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, आपल्या मराठी भाषेला अभिजात मातृभाषेचा दर्जा मिळाला असून अहिराणी भाषेलाही तो मिळाला आहे. त्यामुळे ही मायबोली आपण आपल्या मुलांना शिकवली पाहिजे आणि तिचे जतन केले पाहिजे.
मंत्र्यांचा अहिराणी गीतांवर ठेका!
महोत्सवादरम्यान पार पडलेल्या सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रमात खानदेश मातेच्या भक्तिगीत व पारंपरिक अहिराणी गाण्यांनी उपस्थितांसह सर्वांचेच मन जिंकले. या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी देखील उत्स्फूर्तपणे अहिराणी गीतांवर ठेका धरत उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. या क्षणाने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली होती.

















