
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्वबंधुत्व दिन आणि राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १९ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागातर्फे देशव्यापी महा रक्तदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ब्रह्माकुमारीज् रहाटणी सेवा केंद्रातर्फे शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
२१ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचे यावर्षी देशभरात १ लाख युनिट रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात १ लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते.
रहाटणी येथील रक्तदान शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत औंध जिल्हा रुग्णालय रक्तपेढी, पुणे यांच्या विशेष सहकार्याने पार पडले. रहाटणी परिसरातील नागरिक तसेच युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन रहाटणी प्रभागाच्या नगरसेविका अर्चनाताई विनोद तापकीर, प्रसिद्ध चिकित्सक डॉ. निशा तेली, रहाटणी केंद्र प्रभारी राजयोगिनी बी. के. वर्षा दीदी, बी. के. अर्चना दीदी, बी. के. सुशीला दीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी अर्चनाताई तापकीर यांनी उपस्थित राहून ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या सामाजिक आणि मानवतावादी सेवाकार्याचे कौतुक केले.
‘रक्तदान म्हणजे जीवनदान’
यावेळी मार्गदर्शन करताना राजयोगिनी बी. के. वर्षा दीदी यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले. “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या एका युनिट रक्तामुळे गरजूंचे प्राण वाचविण्यास मदत होते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित रक्तदात्यांमध्ये सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.
रक्तदात्यांचा सन्मान
शिबिराच्या सांगता प्रसंगी अर्चनाताई तापकीर आणि बी. के. सुशीला दीदी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र, अल्पोपहार आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
सेवा, करुणा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या महा रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

















