
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्या भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या ४० दिवसीय चालिहो महोत्सवाची पिंपरी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. यानिमित्त बाबा छतुंराम लाल मंदिर येथून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत सिंधी समाजासह हिंदू समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सिंधी समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार चालिहो हा ४० दिवसांच्या उपासना, प्रार्थना, भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा काळ मानला जातो. भगवान झुलेलाल यांनी संकटग्रस्त सिंधी बांधवांचे रक्षण केल्याच्या श्रद्धेतून ही परंपरा सुरू झाली असल्याचे सांगितले जाते. चालिहोच्या सांगतेनिमित्त भगवान झुलेलाल तथा वरुणदेवतेची आराधना करून दीपदान करण्याची परंपरा आहे.
२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी बाबा छतुंराम लाल मंदिर येथून निघालेल्या मिरवणुकीत विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार, ढोल-ताशा पथक, वारकरी दिंडी, भगवान झुलेलाल यांच्या विविध मंदिरांतील प्रतिमा तसेच सिंधी समाजातील विविध संत व गुरूंच्या प्रतिमा सहभागी झाल्या होत्या. भक्तगण भजन, नृत्य आणि झुलेलाल नामस्मरणात तल्लीन झाले होते.
मिरवणुकीत महिला, तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि भजन-कीर्तनामुळे मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या कार्यक्रमाला नगरसेवक ढब्बू आसवानी, नगरसेविका सविता आसवानी, भारतीय सिंधु सभा पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष मनोहर जेठवानी, धनराज आसवानी, भगवान लालवानी, श्रीचंद नागरानी, ज्योतीका मलकानी, मनिष पंजाबी, सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोपीचंद आसवानी, महेश मोटवानी, किरण रामनानी, अजित कंजवानी, हेमंत राजस्थ, हिरालाल रिझवानी, आत्मप्रकाश मताई, अॅड. नानिक पंजाबी, ज्योती मुळचंदानी, भगवानदास खत्री, तुलसीदास तलरेजा, सुशील बजाज, मोतीलाल चुघवानी, नारायण नाथानी, मनोज पंजाबी, गुलुसेठ आसवानी, दौलत खतवानी, हरीश महाराज, श्री आसवानी, प्रकाश लखवानी, बांधकाम व्यावसायिक परमानंद जमतानी, ऐशिराम हरजानी, कंचन रामनानी, नंदू नारंग, किशन भन्साळी, हरेश लालवानी, जवाहर कोटवानी यांच्यासह सिंधी समाजातील आणि हिंदू समाजातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चालिहो महोत्सवाच्या सांगतेनिमित्त आयोजित या भव्य मिरवणुकीतून सिंधी समाजाची धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.

















