

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या पिंपरी-चिंचवड केंद्रावरील प्राथमिक फेरीला १६ नोव्हेंबरपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही स्पर्धा रंगत असून, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील एकूण २७ नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून विविध विषयांवरील नाट्यप्रयोग सादर होत असून, आतापर्यंत एकूण १५ नाट्यप्रयोगांचे सादरीकरण झाले आहे. यामध्ये ‘रमा VS रमी’, ‘सावली’, ‘पूर्णविराम’, ‘आलामंतर कोलामंतर’, ‘द मिसिंग ट्रुथ’, ‘सल’, ‘चार चौघी’, ‘सांग कधी कळणार तुला’, ‘सेल्फ इंप्रीझनमेंट’, ‘गटार’, ‘द एक्सेप’, ‘तू म्हणशील तसं’, ‘मळम’, ‘उमज’ आणि ‘द नॉव्हेलिस्ट’ या नाटकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सामाजिक, कौटुंबिक, विनोदी आणि समकालीन विषयांची मांडणी विविध नाट्यसंस्थांनी केली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि रंगभूमीवरील इतर तंत्रज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून प्रत्येक नाट्यप्रयोग साकार होत आहे. हौशी रंगभूमीवरील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मिळणारे हे व्यासपीठ अनेक नवोदित कलाकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
स्पर्धेतील नाट्यप्रयोग दररोज दुपारी १२.३० वाजता आणि सायंकाळी ७ वाजता अशा दोन सत्रांत सादर होत आहेत. आज २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या स्पर्धेचे पिंपरी-चिंचवड केंद्राचे समन्वयक म्हणून राजेंद्र बंग, तर सहसमन्वयक म्हणून पंकज चव्हाण काम पाहत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन आणि आयोजन करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड तसेच परिसरातील नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांच्या कलाविष्काराला दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.



















