

भांडार विभागाच्या उपायुक्त केरुले मॅडम दाद देईना बैठकिला सतत गैरहजर.
अधिकाऱ्यांची मनमानी की प्रशासनाचा माज?
क्रीडा समितीच्या सभेला अधिकाऱ्यांची दांडी; संतप्त सभापतींसह सदस्यांनी सभा तहकूब!
क्रीडा आणि भांडार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीने लोकप्रतिनिधींचा संताप अनावर; महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी वर्गाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेच्या क्रीडा समितीच्या महत्त्वपूर्ण सभेला क्रीडा विभाग आणि भांडार विभागाचे संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने सभापती कैलास कुटे यांच्यासह सदस्यांचा संताप अनावर झाला. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करत संतप्त सभापती आणि सदस्यांनी अखेर सभा तहकूब केली.
क्रीडा समितीच्या सभेत शहरातील क्रीडा विषयक प्रश्न, विविध उपक्रम, साहित्य खरेदी आणि विभागाच्या कामकाजासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, ज्या विभागांच्या विषयांवर चर्चा होणार होती, त्याच विभागांचे अधिकारी सभेला उपस्थित न राहिल्याने समितीचे कामकाज ठप्प झाले. यामुळे सभापती कैलास कुटे तसेच सदस्य/नगरसेवक योगेश लांडगे आणि धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधी सभेला उपस्थित, मात्र अधिकारी गायब!
महापालिकेच्या समितीच्या सभेला सभापती आणि सदस्य आपला वेळ देऊन नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपस्थित राहतात. विविध विषयांवर निर्णय घेणे, प्रशासनाला सूचना देणे आणि कामकाजाचा आढावा घेणे हा समितीचा महत्त्वाचा उद्देश असतो. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारीच सभेला उपस्थित राहत नसतील, तर समितीच्या कामकाजाचा उपयोग काय? असा सवाल संतप्त सदस्यांनी उपस्थित केला.
अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींचा वेळ वाया गेला आणि समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला. ही केवळ एका सभेतील गैरहजेरी नसून, समितीच्या कामकाजाप्रती असलेल्या जबाबदारी आणि प्रशासकीय गांभीर्याचा प्रश्न असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.
क्रीडा अन् भांडार विभागाच्या अधिकाऱ्यांना सभेचे गांभीर्य नाही का?
महापालिकेच्या समितीच्या सभेला उपस्थित राहणे, विषयांवरील माहिती सादर करणे आणि लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. असे असताना महत्त्वाच्या सभेला अनुपस्थित राहण्यामागचे कारण काय? अधिकाऱ्यांना समितीच्या कामकाजाचे गांभीर्य नाही का? लोकप्रतिनिधींच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? की महापालिकेत अधिकारी वर्गाची मनमानी सुरू आहे? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
प्रशासनाचा माज की जबाबदारीचा अभाव?
महापालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे अपेक्षित आहे. समितीच्या सभांना अधिकारी उपस्थित राहून विषयांची माहिती देणे, प्रश्नांचे निराकरण करणे आणि निर्णय प्रक्रियेला सहकार्य करणे आवश्यक असते. परंतु अधिकाऱ्यांच्या अशा गैरहजेरीमुळे प्रशासकीय शिस्त आणि उत्तरदायित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लोकप्रतिनिधींच्या सभेलाच अधिकारी गैरहजर राहत असतील, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्नांना किती गांभीर्याने घेतले जात असेल? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
क्रीडा समितीच्या सभेला गैरहजर राहिलेल्या संबंधित अधिकारी वर्गाच्या भूमिकेबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार? त्यांच्या अनुपस्थितीची कारणे विचारली जाणार का? जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार का? की या प्रकाराकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले जाणार? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या कारभारात अधिकारी वर्गाने लोकप्रतिनिधींच्या सभांचा आदर राखून जबाबदारीने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रशासनातील अशा मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण होण्याऐवजी ते अधिकच प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.
क्रीडा समितीच्या सभेला अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि त्यामुळे सभा तहकूब होण्याची घटना महापालिकेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर आरसा दाखवणारी ठरली असून, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रशासन जाब विचारणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
यावेळी क्रीडा सभापती कैलास कुटे, नगरसेवक योगेश लांडगे, तंतरपाळे, उदय गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.



















