
वाहतुकीला अडथळा; महामेट्रोच्या ठेकेदारावर कारवाईची मनसेची मागणी, आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर जलवाहिनीची दुरुस्ती
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडीतील टिळक चौक आणि बसस्थानक परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, तर नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकाराला महामेट्रोच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या परिसरात महामेट्रोच्या पिलरचे काम सुरू आहे. या कामादरम्यान लगतची महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले. काम करताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप मनसेने केला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या चार ते पाच घटना घडल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.
या गंभीर समस्येबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, वारंवार अशा घटना घडत असल्याने महामेट्रोच्या कामाच्या दर्जावर आणि ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापुढे मेट्रोची कामे करताना महापालिकेच्या जलवाहिन्या आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि प्रथम महिला नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांनी केली आहे.



















