
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील नदीघाटांवर छटपूजा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता नदीघाटांचे विद्रूपीकरण करून छटपूजेची तयारी केली जात असल्याचा आरोप करत मनसेने महापालिका आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनानुसार, १३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या छटपूजा कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरातील विविध नदीघाटांवर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी न घेता इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन कसे केले जात आहे, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नदीघाटांचे सुशोभीकरण केले आहे. मात्र, सध्या या सुशोभित घाटांवर आयलँड पेंटिंग, रॅम्प, ओढण्यांसह चौकोनी बॉक्स आदींच्या माध्यमातून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचा वैयक्तिक मालमत्तेसारखा वापर सुरू असल्याबद्दलही मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच, घाटांवर सुरू असलेल्या कामांबाबत महापालिकेचे सुरक्षा रक्षक नेमकी काय भूमिका बजावत आहेत? परवानगीशिवाय सुरू असलेल्या कामांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? असा सवाल उपस्थित करत सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
शहरातील कोणत्याही नदीघाटावर रीतसर परवानगीशिवाय छटपूजा कार्यक्रम होऊ देऊ नये, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, संबंधित महापालिका अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच सुरू असलेली अनधिकृत कामे तातडीने थांबवावीत, अशा मागण्या मनसेने केल्या आहेत.
या निवेदनावर मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू दत्त सावळे आणि शहराध्यक्ष/सचिव रुपेश बाजीराव पटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



















