
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा!
‘पुरुषोत्तम करंडका’च्या धर्तीवर स्पर्धेची आमदार शंकर जगताप यांची घोषणा;
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रंगभूमीला नवे कलाकार मिळावेत, नवोदितांच्या अभिनयाला संधी मिळावी आणि शहरातील नाट्यचळवळीला व्यापक व्यासपीठ मिळावे, या दृष्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वर्गीय नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध ‘पुरुषोत्तम करंडक’च्या धर्तीवर ही स्पर्धा घेण्याची घोषणा विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा’च्या वर्धापन दिन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ही महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.
लोकनेते भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘कलाकार कट्टा’ने एका वर्षात विविध कलाप्रकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम केले आहे. नवोदित कलाकारांपासून अनुभवी कलावंतांपर्यंत सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी देणाऱ्या या उपक्रमाचा वर्धापन दिन गुरुवारी (५ नोव्हेंबर) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात साजरा झाला. ‘नांदी नव्या पर्वाची, शोध प्रतिभेचा जागर कलेचा’ ही संकल्पना संपूर्ण कार्यक्रमातून अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर तबलावादनाच्या तालसुरांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. नृत्यार्पण ग्रुपच्या कनक देशमुख, वृंदा जोशी, निहारिका शिंदे आणि इशा झा यांनी नृत्य सादर केले. बालकलाकार श्रीजा उज्जैनकर, अन्वी फटांगरे, वरद फटांगरे, यज्ञा पाटील, व्रिहा काळे, रजत देशमुख आणि शौर्य मुजुमदार यांनी बालनाट्याच्या माध्यमातून रंगमंचावर आपली छाप उमटवली.
शब्दांच्या माध्यमातून भावविश्व उलगडणाऱ्या काव्यवाचन सत्रात सुरेश कंक, संजय गमे आणि राधाबाई वाघमारे यांनी कविता सादर केल्या. स्वर सुधा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थीनी निधी लच्याण, रुजुला बांडे, केशवी धर्माधिकारी, श्रेया त्रिकूटकर, गाथा चव्हाण, उर्वी नाईक, मैथिली कुलकर्णी, अस्मी खामितकर आणि गायत्री कुलकर्णी यांनी
गायन सादर करून संगीताची मैफल सजवली.
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडवताना आसाराम कसबे यांनी भारुड सादर केले. दिवंगत ज्येष्ठ लावणी कलावंत मधू कांबीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी शुभ्रा घायतडके यांनी लावणी
सादर केली. गणेश कांबळे यांनी शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नावर आधारित कलाविष्कार सादर केला. सुहास जोशी यांच्या ‘नाटक या विनोदी कथेच्या सादरीकरणाने कार्यक्रमात वेगळी रंगत आणली.
चित्रकलेच्या माध्यमातूनही कलाकारांनी आपली प्रतिभा प्रदर्शित केली. वैशाली गायकवाड आणि रती देशमुख यांच्या चित्रांचे प्रदर्शन रसिकांसाठी खुले करण्यात आले होते. विविध कलामाध्यमांतून व्यक्त होणाऱ्या या सादरीकरणांनी कलाकार कट्ट्याच्या बहुआयामी स्वरूपाचे दर्शन घडवले.
स्मरणिकेतून वर्षभराच्या आठवणींना उजाळा,
‘कलाकार कट्टा’च्या वर्षभरातील उपक्रमांचा, सहभागी कलाकारांचा आणि सांस्कृतिक वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. बारा पुष्पांच्या माध्यमातून खुलत गेलेल्या कलाविश्वाचा हा शब्दबद्ध दस्तऐवज ठरला. एका वर्षात घडलेल्या कलात्मक प्रवासाच्या आठवणी जतन करण्याबरोबरच भविष्यातील वाटचालीसाठीही स्मरणिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सहा कलावंतांचा पुरस्काराने गौरव,
विविध कला क्षेत्रांत योगदान देणाऱ्या कलाकारांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रासाठी सुरेश कंक, गायनासाठी शुभ्रा घायतडके, तबलावादनासाठी वृषाली भणगे, नृत्यासाठी ऋतुजा महाजन, नाट्यक्षेत्रासाठी केतन लुंकड आणि लोककलेसाठी गणेश कांबळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कलाकार कट्ट्याच्या पुढील पर्वाची नांदी
केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रांतील प्रतिभेला एकत्र आणण्याचे काम कलाकार कट्ट्याने केले आहे. कलावंतांना व्यक्त होण्याची संधी, नव्या कलाकारांना प्रोत्साहन आणि रसिकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम असा या उपक्रमाचा प्रवास राहिला आहे. ‘स्व. नाना पाटेकर करंडक’ नाट्यस्पर्धेच्या घोषणेने शहरातील रंगभूमीच्या चळवळीला आणखी एक नवे व्यासपीठ मिळणार आहे. भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविकातून कलाकार कट्ट्याची भूमिका मांडली.
याप्रसंगी नियोजन समितीतील राजेंद्र बंग, राज अहेरराव, प्रकाश ढवळे, किरण येवलेकर, रवी दामोदरे, गौरी लोंढे, पंकज चव्हाण यांनी संयोजनात मदत केली, सीमा गांधी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे आभार आकाश थिटे यांनी केले. विविध क्षेत्रांतील कलाकार, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली.



















