
शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य, दिवाळी फराळ आणि नवीन कपड्यांचे वाटप; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माणुसकीचा दीप उजळवला
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण! मात्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या घरात यंदा या आनंदाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ, मानवतावादी जनशक्ती आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम राबविण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मासुर्डी गावात तसेच धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
या उपक्रमात मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश स्वामी, कामगार नेते तथा कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, सरपंच भाऊसाहेब पाटील,तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रमेश पिंपरे, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, उपाध्यक्ष राजेश माने, चंद्रकांत कुंभार, लाला राठोड, विशाल सरोदे, सुनील भोसले,समशुद्दीन शेख आदी सहभागी झाले होते.
या उपक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य किट, दिवाळीचा फराळ, नवीन कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा केवळ मदत वाटपाचा कार्यक्रम नसून संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आपण एकटे नाही, संपूर्ण कष्टकरी समाज त्यांच्या पाठीशी आहे, हा विश्वास देण्याचा माणुसकीचा उपक्रम असल्याचे नखाते यांनी सांगितले. तसेच शेतकरी कुटुंबांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. केवळ सणासुदीपुरती मदत न करता संकटाच्या काळात कष्टकरी समाजाने एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ज्या बळीराजाच्या कष्टातून आपल्या घरात अन्न येते, त्याच बळीराजाच्या घरात दिवाळीला अंधार असेल तर आपल्या आनंदाला काय अर्थ? शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ मदत नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे. तुम्ही एकटे नाही, संपूर्ण कष्टकरी समाज तुमच्या सोबत आहे, हा विश्वास देण्यासाठी आम्ही तुमच्या बांधावर आलो आहोत. जात, धर्म, भाषा आणि पक्ष यापलीकडे जाऊन माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाणे हाच खरा मानवतेचा धर्म आहे, असे भावनिक प्रतिपादन महेश स्वामी यांनी केले.
गावकऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आपुलकीने स्वागत करत त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. गावकऱ्यांच्या या प्रेमळ आदरातिथ्यामुळे मदत देण्यासाठी गेलेले पदाधिकारीही भारावून गेले आणि सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला.



















